top of page

गायक, संगीतकार बप्पी लहरी यांचं निधन

प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचं निधन झालं आहे. बप्पी लहरी मागील महिनाभरापासून मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना सोमवारी (१४ फेब्रुवारी) घरी सोडण्यात आलं. मात्र, मंगळवारी पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. बप्पी लहरी यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

बप्पी लहिरी यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ झाला होता. बप्पी लहिरी यांचे मूळ नाव आलोकेश लहरी असे होते. सत्तरीच्या दशकात बप्पी लहिरी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतक्षेत्रात अनेक नवे प्रयोग केले. बप्पी लहिरी यांनी 'नन्हा शिकारी' (१९७३) या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पण खऱ्या अर्थाने १९८२ मध्ये आलेल्या मिथुन चक्रवर्ती यांच्या 'डिस्को डान्सर' या चित्रपटामुळे बप्पी लहिरी प्रकाशझोतात आले. त्यानंतर बप्पी लहरी यांनी अनेक चित्रपटांमध्ये गायक आणि संगीतकार म्हणून काम केले. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला रॉक आणि डिस्को संगीताची ओळख करून दिली.

बप्पी लहिरी यांना सोन्याचे दागिने घालण्याची प्रचंड आवड होती. यासाठीही ते प्रसिद्ध होते. बप्पी लहिरी यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक हिट गाणी दिली. 'चलते चलते', 'डिस्को डान्सर' आणि 'शराबी' या चित्रपटांमधील त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी लोकप्रिय ठरली. 'बागी 3' या चित्रपटासाठी त्यांनी संगीतबद्ध केलेलं 'बंकस' हे त्यांचे शेवटचे गाणं होते.


Commenti


bottom of page