top of page

वेळेवर उपचार न मिळाल्याने ६ दिवसाच्या कोरोनाबाधित बाळाचा मृत्यू

आई-वडील आणि नातेवाईकांना तीन रुग्णालयाचे उंबरठे झिजवले तरीही ते सहा दिवसीय कोरोनाबाधित बाळाला वाचवू शकले नाहीत. वेळेवर उपचार न मिळाल्याने पालघर जिल्ह्यातील ६ दिवसाच्या बाळाचा मृत्यू झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

ree

पालघर जिल्ह्यातील सफाळ्यात खासगी रुग्णालयात ३१ मे रोजी एका बाळाचा जन्म झाला. बाळाची मूदतपूर्व प्रसूती असल्याने त्याचं वजन कमी होतं. त्यामुळे त्याला चांगल्या उपचारासाठी पालघरमधील एका रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. तिथे गेल्यानंतर बाळाची आई आणि बाळाची कोरोना अँटीजेन चाचणी करण्यात आली. त्या रिपोर्टमध्ये आईचा रिपोर्ट निगेटीव्ह, तर बाळाचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला. त्यांनंतर त्यांना तात्काळ पालघरमधील ग्रामीण रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आलं. मात्र तिथेही योग्य सुविधा नसल्याने पुढील उपचारासाठी जव्हार येथील रुग्णालयात हलविण्यात आलं. मात्र यात बाळाची प्रकृती खालावत गेली.

जव्हारमध्येही वैद्यकीय सुविधा अपुऱ्या असल्याने तातडीने नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करणयात आलं. गेल्या दोन दिवसांपासून त्याच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र शनिवारी ६ दिवसांच्या बाळाने अखेरचा श्वास घेतला.


 
 
 

Comments


bottom of page