top of page

शाहरुख खानचा मुलगा आर्यन 'एनसीबी'च्या ताब्यात

रेव्ह पार्टी प्रकरण; एनसीबीने जाहीर केली ताब्यात घेतलेल्यांची यादी


मुंबई: मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर शनिवारी रात्री उशिरा अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) छापेमारी केली. यावेळी क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीवर कारवाई करत एनसीबीने आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेल्यांमध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश आहे. एनसीबीने केलेल्या या कारवाईमुळे बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ माजली आहे. आर्यन खानचा जवळचा मित्र अरबाज मर्चंटदेखील यावेळी उपस्थित होता. या सर्वांची सध्या एनसीबी अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे.

ree

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. समीर वानखेडे यांनी एकूण आठ जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु असल्याची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी चौकशी सुरु असलेल्यांची नावं जाहीर केली असून आर्यन खानच्या नावाला दुजोरा दिला आहे. आर्यन खान, अरबाज मर्चेंट, मुनमुन धमेचा, नूपुर सारिका, इसमीत सिंह, मोहक जसवाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

दरम्यान, एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यन खानचे क्रूझवरील व्हिडीओ मिळवले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्हिडीओंमध्ये आर्यन खान सफेद टी-शर्ट, लाल शर्ट, निळी जीन्स आणि टोपीत दिसत आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यन खानचा मोबाइल फोन जप्त केला असून त्यामधील चॅट्स आणि टेक्स्ट मेसेजेची तपासणी केली जात आहे. याशिवाय ताब्यात घेतलेल्या इतरांचेही मोबाइल तपासले जात आहेत.


 
 
 

Comments


bottom of page