top of page

खंडणीसाठीच आर्यन खानचं अपहरण केलं... पण एका सेल्फीने खेळ बिघडवला...

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत केले नवे गौप्यस्फोट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेण्यापूर्वी ट्विटरवरून सॅम डिसूझाचे खरे नाव वेगळेच असल्याचं सांगत त्याचे आणि एनसीबीचे अधिकारी व्ही व्ही सिंग यांच्यातील संवादाची ऑडिओ क्लिप शेअर केली होती. आर्यन खानचं अपहरण करून खंडणी उकळण्याचा हा सगळा डाव असल्याचा आरोप मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. आर्यन खानचं अपहरण करून २५ कोटींची खंडणी मागण्याचा खेळ सुरू झाला. याची डील १८ कोटींमध्ये झाली. ५० लाख रुपये उचलले देखील गेले होते. पण एका सेल्फीने खेळ बिघडवला”, असं नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले. याचबरोबर अपहरण नाट्याचे मास्टरमाईंड मोहीत कंबोज असल्याचा देखील दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

ree

आर्यन खानला २ ऑक्टोबरच्या दिवशी क्रूजवर बोलावण्यात आलं होतं, असं नवाब मलिक म्हणाले आहेत. “प्रतीक गाबा आणि आमिर फर्निचरवाला यांच्या माध्यमातून आर्यन खान क्रूजवर गेला. मोहीत कंबोज यांच्या साल्याच्या माध्यमातून हे जाळं टाकण्यात आलं. तिथे आर्यन खानला पोहोचवलं गेलं. आर्यन खानचं अपहरण करून २५ कोटींची खंडणी मागण्याचा खेळ सुरू झाला. याची डील १८ कोटींमध्ये झाली. ५० लाख रुपये उचलले देखील गेले होते. पण एका सेल्फीने खेळ बिघडवला”, असं नवाब मलिक म्हणाले आहे. के. पी. गोसावीचा आर्यन खानसोबतचा सेल्फी व्हायरल झाला होता.

दरम्यान, भाजपाचे नेते मोहीत कंबोज आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे मित्र असल्याचा देखील दावा नवाब मलिक यांनी केला. “अपहरणाचे मास्टरमाईंड मोहीत कंबोज आहे. खंडणीच्या खेळात मोहीत कंबोज वानखेडेचे सहकारी आहेत. शहरात त्याची १२ हॉटेल्स आहेत आणि ती हॉटेल्स चालवण्यासाठी शेजारच्या हॉटेल्सवर खोट्या कारवायां करवून घेतल्या. स्मशानभूमीत आपला कुणीतरी पाठिंबा करतंय असा दावा वानखेडेंनी केला. ७ तारखेला मोहीत कंबोज आणि वानखेडे स्मशानभूमीच्या बाहेर भेटले. तिथल्या रहिवाशांनी सांगितलं की एक गाडी आली, त्यात बॉडिगार्ड होते. एक दाढीवाला त्यांना भेटला, वानखेडेंचं नशीब चांगलं की आम्हाला स्मशानभूमीच्या जवळचं सीसीटीव्ही फूटेज मिळालं नाही. तिथला सीसीटीव्ही कॅमेरा बंद होता, असा दावा नवाब मलिक यांनी केला.


 
 
 

Comments


bottom of page