top of page

कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे लसीकरण करून घ्यावे : जिल्हाधिकारी

मातापित्यांच्या लसीकरणासाठी तरूणांनी पुढाकार घ्यावा-विविध कार्यालयांनाही मोहिम राबविण्याचे निर्देश

ree

अमरावती : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी सर्वांचे लसीकरण होणार असून, सध्याच्या टप्प्यात ज्येष्ठांचे लसीकरण होत आहे. या लसीकरणाबाबत केंद्र शासनाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यांचे पालन व्हावे. ज्येष्ठ सदस्यांच्या लसीकरणाची मोहिमच आता जिल्ह्यातील 27 केंद्रांवर राबविण्यात येत आहे. नागरिकांनी पुढाकार घेऊन आपल्या मातापित्यांचे व कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे केले.


जिल्ह्यातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या प्रमुखांनीही मोहीम हाती घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे लसीकरण करून घेण्याचा स्वतंत्र आदेश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी आज जारी केला.

नवाल म्हणाले की, लसीकरणाच्या चालू टप्प्यात 60 वर्षांवरील सर्व आणि सहव्याधी असणाऱ्या 45 ते 59 वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होत आहे. त्याबाबत केंद्र शासनानेही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोविड-19 व्यतिरिक्त दुसरी कुठलीही लस घ्यायची असल्यास दोन वेगवेगळ्या लसीत कमीत कमी 14 दिवसाचे अंतर असावे. कोविड-19 लसिकरणाचे दोन्ही मात्रा एकाच प्रकारच्या घेणे आवश्यक आहे. पहिली मात्रा एका कंपनीची आणि दुसरी मात्रा दुसऱ्या कंपनीची घेऊ नये. उदाहरणार्थ, पहिली मात्रा जर कोव्हॅक्सिन घेतली असेल तर दुसरी मात्रा कोविशिल्ड घेता येत नाही, असे मार्गदर्शक सूचनेत नमूद आहे.

त्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम म्हणाले, ज्या व्यक्तीला कोविड-19 च्या मात्रेची गंभीर ॲलर्जिक रिॲक्शन आली असेल, लस दिल्यानंतर लगेच किंवा उशीरा अतिगंभीर ॲनफालाक्सिक किंवा ॲलर्जिक रिॲक्शन आली असेल किंवा लस, इंजेक्शन, औषधे किंवा अन्नपदार्थामुळे रिॲक्शन येत असेल अशा व्यक्तींनी लस घेऊ नये. गर्भवती व स्तनदा माता यांना लस देऊ नये कारण या गटात ट्रायल झालेली नाही. त्यामुळे ज्या महिला गर्भवती आहे किंवा त्यांना आपल्या गर्भारपणाची शाश्वती नाही त्यांनी लस घेऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अशा परिस्थितीत व्यक्ती दुरुस्त झाल्यानंतर 4 ते 8 आठवड्यानंतर लसीकरण करु शकतो. ज्यांना कोविड-19 आजाराची लक्षणे आहेत, ज्या कोविड-19 रुग्णांना प्लाझ्मा दिला आहे किंवा कोणत्याही इतर आजाराने ग्रस्त रुग्ण रुग्णालयात भरती असून त्याला आयसीयूची गरज असेल किंवा नसेल त्यांना आजारातून बरे झाल्यानंतर 4 ते 8 आठवड्यांनी लसीकरण करता येते, असेही डॉ. निकम यांनी स्पष्ट केले.

विशेष खबरदारी ज्या व्यक्तींना रक्तस्त्रावाचा (Bleeding), किंवा रक्त गोठण्याची प्रक्रिया उदा. क्लॉटिंग फॅक्टर डिफिशिएन्सी, प्लेटलेट डिसऑर्डर किंवा Coagulopathy आदी असेल त्यांनी खबरदारी घेऊन लस घ्यावी.

खालील बाबींमध्ये लस देण्यास हरकत नाही ज्यांना कोविड-19 आजार झाला होता, उपचारानंतर ते बरे झाले. मुदतीचे (क्रॉनिक) आजार किंवा इतर संलग्न आजार (उदा. कार्डियाक, न्युरॉलॉजिकल, मेटॉबॉलिक, Renal, Malignancies) इत्यादींना लस घेण्यास हरकत नाही. इम्युनो-डिफीशिएन्सी, एचआयव्ही आणि जे रुग्ण इम्युनो सप्रेशन उपचारावर आहेत, अशा व्यक्तींना लस देण्यास हरकत नाही. (यांच्यामध्ये लसीपासून निर्माण होणारी प्रतिकारशक्ती कमी असू शकते. मात्र लस द्यायला हरकत नाही.)

कोविड-19 लस सुरक्षित आहे. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी ही लस सर्वांनी घेणे गरजेचे आहे. ही लस घेतल्यानंतरही सर्वांनी दक्षता त्रिसूत्रीचे पालन करावे. म्हणजेच सामाजिक अंतर ठेवणे, वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर आणि मास्क वापर करणे अत्यावश्यक आहे, असे डॉ. निकम यांनी सांगितले.

Comments


bottom of page