top of page

तौत्के चक्रीवादळ: राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

अरबी समुद्रात निर्माण झालेले तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने निघाले असून येत्या दोन दिवसांत ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ree

तौत्के चक्रीवादळ शनिवारी केरळजवळून पुढे सरकल्यानंतर, पश्चिम महाराष्ट्रातील तसेच दक्षिण कोकणातल्या काही भागांत पाऊस कोसळू लागला आहे. १६ आणि १७ मे रोजी हे वादळ कोकण किनारपट्टीला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे. परिणामी राज्यात आज कोकण, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, मराठवाडा व विदर्भात सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.


चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसण्याची शक्यता आहे. या भागांसह आजूबाजूच्या काही परिसरातही १६ आणि १७ मे रोजी अतिवृष्टी ते मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. किनारपट्टीवर ताशी ६० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत.


तौत्के चक्रीवादळ १६ मे रोजी अतितीव्र स्वरूप धारण करणार आहे. त्यामुळे समुद्रात वाऱ्यांचा वेग ताशी १२५ ते १७५ किलोमीटर असेल. १६ ते १८ मे या कालावधीत ते अतितीव्रच राहणार असून, याच काळात ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळून जाणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या संभाव्य मार्गानुसार चक्रीवादळ १८ मे रोजी दुपार्री किंवा संध्याकाळी गुजरातच्या पोरबंदरजवळ धडकून पुढे जाईल. त्यानंतर त्याचा वेग आणि प्रभाव कमी होईल. मात्र, त्यामुळे गुजरातमध्ये त्याचा मोठा तडाखा बसण्याची शक्यता आहे.


 
 
 

Comments


bottom of page