top of page

महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप; अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज दुपारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्याला आता दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. अजित पवार यांच्या सोबत राष्ट्रवादीच्या काही आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.

ree

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार मागील काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. अजित पवार आपल्या समर्थक आमदारांच्या वतीने पक्षावर दबाव टाकत असल्याची चर्चा सुरू होती. यानंतर आज सकाळपासून अजित पवारांच्या देवगीरी बंगल्यावर अजित पवार समर्थक आमदारांची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, नीलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, अमोल मिटकरी, अदिती तटकरे आदी उपस्थित होते.

या बैठकीनंतर अजित पवार राजभवनावर दाखल झाले. त्यानंतर काही वेळातच राज्यपाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रिफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

दरम्यान, या सर्व नाट्यमय घडामोडींवर आपण शरद पवारांशी बोललो आहोत. आपण खंबीर असल्याचे शरद पवारांनी आपल्याला सांगितले असल्याचे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.


 
 
 

Comments


bottom of page