top of page

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: ४ भाविक ठार, १८ जखमी

सोलापूर : ट्रॅक्टर ट्रॉली व ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात ४ भाविकांचा मृत्यू झाला. सोलापूर-पुणे महामार्गावरील कोंडी येथे रात्री पावणेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. एकादशीनिमित्त हे सर्वजण विठुरायाच्या दर्शनासाठी रविवारी रात्री ट्रक्टर ट्रॉलीत बसून पंढरपूरला निघाले होते. यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरात धडक दिली. या अपघातात ४ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर १८ जण जखमी झाले असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मृत आणि जखमी हे सर्वजण कदमवाडी (ता. तुळजापूर) येथील रहिवासी आहेत.

ree

तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील राहणारे भाविक एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी रात्री ट्रॅक्टर ट्रॉलीत बसून पंढरपूरला निघाले होते. सोलापूर-पुणे महामार्गावरील कोंडी गावच्या शिवारात ट्रॅक्टर ट्रॉलीला सोलापूरहून पुण्याकडे सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकने (एमएच १२ टीव्ही ७३४८) पाठीमागून जोरात धडक दिली. भरधाव वेगातील ट्रकचे पुढील चाकाचे टायर फुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि मालमोटार भाविकांच्या ट्रक्टर ट्रालीवर पाठीमागून जोरात धडकली. ट्रॅक्‍टर ट्रॉलीमधील अनेकजण महामार्गावर उडून पडले होते. अपघात येवढा भीषण होता की ट्रकने ट्रॅक्‍टर ट्रॉलीला १०० ते १५० फुटापर्यंत फरफटत नेले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक युवकांनी प्रशासनाच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. जखमींना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर १८ जण जखमी झाले. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही तास ठप्प झाली होती. वाहतूक व स्थानिक पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

अपघातातील मृतांची नावे समजली नाहीत. राम शिंदे (वय ५०), मच्छिंद्र मोरे (वय ५६), आनंद मिसाळ (वय ६०), समाधान शिवाजी कदम (वय ४०), आकाश किसन गिरी (वय ६५), मंदा कदम (वय ५०), सुलभा साळुंके (वय ५०), जयश्री साळुंके (वय ४०),समर्थ साळुंके (वय २५), निर्मला कदम (वय ४०), शीतल शिंदे (वय ३५), शुभम शिंदे (वय २५) यांच्यासह १८ जण या अपघातात जखमी झाले आहेत.


 
 
 

Comments


bottom of page