top of page

कारची उसाच्या ट्रॉलीला धडक; भीषण अपघातात तिघा मित्रांचा मृत्यू

अहमदनगर :भरधाव कारने उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तीन मित्रांचा मृत्यू झाला आहे. रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा -काष्टी रस्त्यावर हा अपघात झाला आहे. राहुल सुरेश आळेकर (वय २२ रा. श्रीगोंदा), केशव सायकर (वय २२ रा. काष्टी) आणि आकाश रावसाहेब खेतमाळीस (वय १८ रा. श्रीगोंदा) असं अपघातात मृत पावलेल्या तीन मित्रांची नावं आहेत.

ree

मिळालेल्या माहितीनुसार मृत राहुल आणि आकाश हे दोघं आपला मित्र केशव सायकर याला त्याच्या गावी काष्टी याठिकाणी सोडण्यासाठी श्रीगोंद्याहून जात होते. रात्री एकच्या सुमारास हॉटेल अनन्यासमोरून जात असताना वाहनचालकाला समोर असणाऱ्या उसाच्या ट्रॉलीचा अंदाज आला नाही. तसेच कारचा वेगही अधिक असल्याने कारची उसाच्या ट्रॉलीस पाठीमागून जोरदार धडक बसली आहे. हा अपघात इतका भीषण होता, की कारचा अक्षरशा चक्काचूर झाला आहे.

ree

आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त युवकांना कारमधून बाहेर काढले. यावेळी केशव सोयकर आणि आकाश खेतमाळीस या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याच समोर आले. जखमी राहुल याला श्रीगोंद्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अपघातात तीन मित्रांचा अशाप्रकारे एकाच वेळी मृत्यू झाल्याने श्रीगोंदा आणि काष्टी गावावर शोककळा पसरली आहे.

श्रीगोंदा ते दौंड हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा आणि मोठा असल्याने या रस्त्यावर वाहनांची गती अधिक असते.ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला मागील बाजूस रिफ्लेक्टर नसल्याने हा अपघात घडला असल्याचं बोललं जात आहे.


 
 
 

Comments


bottom of page