top of page

भरधाव ट्रक घरात घुसला; तरुणाचा मृत्यू

भुसावळ : भरवस्तीत भरधाव ट्रक घुसल्याने झालेल्या अपघातात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे. शहरातील यावल रोडवरील डॉ.आंबेडकर नगर येथील भरवस्तीत शनिवारी सकाळी १० वाजता ही घटना घडली. सम्राट दादाराव इंगळे असे मयत तरुणाचं नाव असुन त्याचा भाऊ निलेश इंगळे हा जखमी झाला आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने चालकास चोपून काढले.

ree

शहरातील यावल नाक्यासमाेरील डॉ. आंबेडकर नगरातील रहिवासी सम्राट दादाराव इंगळे (२१, डॉ.आंबेडकर नगर, भुसावळ) घरात आंघोळ करत असताना सकाळी १० वाजता भरधाव ट्रकने (क्रमांक एमएच.४६-एएफ. ५५५४) त्यांच्या घराला धडक दिली. त्यामुळे अंगावर भिंत पडून सम्राट आणि घरात झोपलेला त्याचा भाऊ नीलेश इंगळे हे जखमी झाले. इंगळे यांच्या घराला ट्रकने धडक दिल्याचे कळताच नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. ढिगाऱ्यात अडकलेले जखमी सम्राट व नीलेश या भावंडांना हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. सम्राटला मृत घोषित करताच कुटुंबीयांनी आक्रोश केला. वाढदिवसा दिवशीच सम्राटच्या आयुष्याचा शेवट झाल्याने संतप्त जमावाने रास्ता रोको आंदोलन केले.

दुसरीकडे संतप्त जमावाने ट्रकचालक कलीम सलीम कुरेशी (रा. सावदा) याला वाहनातून बाहेर काढून चोप दिला. नंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. याप्रकरणी नीलेश इंगळे याच्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलिसांत ट्रक चालक कलीम सलीम कुरेशी (रा.सावदा) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला.


 
 
 

Comments


bottom of page