top of page

मित्रासाठी, विमान बोलावले तर विशेष काय? कोणतेही दिव्य पार करू, पण मित्राचा जीव वाचला पाहिजे...

मित्रासाठी अभिजीत पाटलांची धावाधाव; एअर अ‍ॅम्ब्युलन्सने थेट मुंबईला हलवलं

सोलापूर : पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांची एक कृती सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असलेल्या मित्राची तब्येत खालावल्याने अभिजीत पाटील यांनी त्यांच्या मित्राला एअर अ‍ॅम्ब्युलन्सने सोलापुरातून थेट मुंबईला हलवलं. अभिजित पाटील यांनी स्वतः सोशल मिडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि जळोली गावचे रहिवासी दत्तात्रय नरसाळे यांना मागील चार दिवसांपासून पोटदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांना सुरुवातीला सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तेथे त्यांच्या पोटावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र तरीही दत्तात्रय नरसाळे यांची तब्येत खालावत होती.

विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी आपला मित्र अत्यवस्थ झाल्यानंतर त्याच्या उपचारासाठी कोणतीही हयगय व वेळ न दवडता थेट मुंबईहून एअर अ‍ॅम्ब्युलन्स बोलावली व मुंबईत उपचाराचा निर्णय घेतला. मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटल येथे त्यांच्या मित्रावर उपचार सुरू केले आहे.


अभिजित पाटील यांनी काय म्हटलं आहे पोस्टमध्ये..

मित्रासाठी, विमान बोलावले तर विशेष काय? कोणतेही दिव्य पार करू.. पण मित्राचा जीव वाचला पाहिजे.. त्याला स्वास्थ्य लाभलेच पाहिजे..

जळोली गावचे सहकारी मित्र व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री.दत्तात्रय नरसाळे यांना मागील चार दिवसांपासून पोटदुखीचा त्रास होत असल्यामुळे सोलापूर येथील आश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले लहान आतड्यास गॅगरीन मुळे शस्त्रक्रिया केली परतू त्यांची तब्येत खालावत होती. पोटात आतड्यात इन्फेक्शन जास्त असल्यामुळे मुंबई येथील मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये अनेक तज्ञ डॉक्टरांशी मुंबईत जाऊन चर्चा करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मित्रास सोलापूर अश्विनी हॉस्पिटल येथून दुपारी ४ वाजता विमान ॲम्बुलन्सने मुंबई येथे दाखल केले..

सहकारी मित्रास चांगल्या सुख सुविधा व अधिक टेक्नॉलॉजीमुळे मुंबई येथे ग्लोबल हॉस्पिटल येथे हलवण्यात आले आहे. मी स्वत: त्यांच्या सोबत माझी जबाबदारी म्हणून एअर ॲम्बुलन्स घेऊन सोलापुरातून मुंबईला हाॅस्पिटल येथे उपचार घेऊन आलो उपचार सुरू केले आहेत. लवकर आजारातून होऊन बरे होतील हा विश्वास वाटतो..



Comments


bottom of page