top of page

...गावकऱ्यांनी आमदारावर फेकल्या चपला

तेलंगणा राज्यात मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले असून राज्यातील इब्राहिमपटणमच्या मेदिपल्ली गावातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या एका आमदारावर आणि समर्थकांवर तेथील लोकांनी चप्पल फेकून मारल्या. इतकेच नाही तर लोकांनी आमदारांच्या गाडीची देखील तोडफोड करत आपला राग व्यक्त केला. मंचीरेड्डी किशन रेड्डी असे या आमदाराचे नाव आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून यामध्ये लोक चपला फेकून मारताना दिसत आहेत. आमदार रेड्डी मेदिपल्ली गावात येणार असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली. त्यानंतर रेड्डी यांना गावात प्रवेश द्यायचा नाही, असे गावकऱ्यांनी ठरवले. आमदार रेड्डी यांचा ताफा गावात येताच गावकऱ्यांनी त्यांच्या विरोधात घोषणा द्यायला सुरू केले. त्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी आमदारांच्या गाडीवर चपलांचा वर्षाव केला. काहींनी दगडफेक देखील केली. तातडीने पोलिसांनी कारवाई करत लाठीचार्ज केला. या प्रकरणी पोलिसांनी गावच्या सरपंचासह काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांना ताब्यात घेतले आहे.

bottom of page