
महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Friday, 7 August 2026
कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसला नाही-एकनाथ खडसे
कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसला नाही-एकनाथ खडसे मुंबई : मी गेल्या चाळीस वर्षांपासून राजकारण करतो आहे. मात्र कधीही कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. तोंडावर गोड बोलायचं, तुम्ही ज्येष्ठ म्हणायचं आणि मागून खंजीर खुपसायचा हे मी कधीही केलं नाही. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी टोला लगावला आहे. ४० वर्षे मी भाजपाची सेवा केली, त्याबदल्यात मला काय दिलं पक्षाने? माझ्यावर झालेल्या अन्यायाचं उत्तर भाजपाचे लोक देऊ शकले नाही. मी पक्ष सोडावा अशी कार्यकर्त्यांची भावना होती. शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यानंतर त्यांनी हा आरोप केला आहे. गेली ४० वर्षे भाजपला वाढवण्यात अप्पर कष्ट घेऊन भाजपचा चेहरा मोहरा बदलण्यात महत्वाचे योगदान देणाऱ्या एकनाथ खडसे यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी कन्या रोहिणी आणि शेकडो कार्यकर्त्यांसमवेत आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. पुढे बोलताना खडसे म्हणाले, भूखंडाची चौकशी माझ्या मागे लावण्यात आली. काही दिवस जाऊद्या कुणी किती भूखंड घेतले आहेत ते मी दाखवून देईन. नियमाच्या बाहेर जे वागले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मी करणार आहे . राजकीय जीवनातून घरी बसण्याचीच तयारी केली होती. भाजपाला हेच वाटत होतं, कारण मला भाजपा तर काही देणार नाही. तिकिट मागितलं तर म्हणतात तुम्ही ज्येष्ठ आहे.मला सांगतात, नाथाभाऊ तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. चार दिवस ज्यांना भाजपात येऊन झाले नाहीत असे लोक म्हणतात मार्गदर्शन करा. मी राष्ट्रवादीत जाणार तर बोंबाबोंब झाली. मग तुम्ही सकाळी पाच वाजता शपथ घेतली तेव्हा तुम्हाला राष्ट्रवादी पक्षच चांगला वाटला ना? पहाटे पाचला जसा तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगला वाटला होता त्यापेक्षा मला राष्ट्रवादी पक्ष चांगला वाटतो आहे ना.. म्हणून मी आलो राष्ट्रवादीत असं म्हणत पहाटेच्या शपथविधीवरही खडसेंनी टीका केली. आज राष्ट्रवादीत आल्याने मला माझ्या डोक्यावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं आहे असंही खडसे यांनी म्हटलं आहे. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड इत्यादी नेते उपस्थित होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार प्रकृतीच्या कारणास्तव या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत.