top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

पोलिसानेच केला घटस्फोटीत महिलेवर अत्याचार

नगर : पोलिसानेच एका घटस्फोटीत महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस शिपाई सुनील रत्नपारखीसह एका डॉक्टर आणि महिलेवर अत्याचार, अ‍ॅट्रोसीटी, बेकायदा गर्भपात व पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

सोलापूर जिल्ह्यात राहणार्‍या एका 33 वर्षीय घटस्फोटीत तरुणीने आपल्या पुनर्विवाहासाठी ऑनलाईन लग्नगाठी जुळविणार्‍या ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या संकेतस्थळावर आपल्या नावाची नोंद केली होती. ११ जानेवारी २०२० रोजी घारगाव पोलीस ठाण्यात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या सुनील यशवंत रत्नपारखी या कर्मचार्‍याची संकेतस्थळावरील नोंदीवरुन त्या महिलेशी संवाद साधला. त्यावेळी त्या महिलेने आपणास दहा वर्षांची मुलगी असून तिचा सांभाळ करणार असाल तरच लग्न करण्याची अट घातली.

संबंधित पोलीस शिपायाने आपणही घटस्फोटीत असून आपणास दोन मुली आहेत व त्या दोघीही आपल्यासोबतच राहतात असे त्या महिलेला सांगितले. त्यावरुन त्या दोघांचीही लग्नावरुन परस्पर सहमती झाल्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात त्या कर्मचार्‍याने थेट त्या महिलेचे सोलापूर जिल्ह्यातील गाव गाठून सदर महिलेच्या आई व भावांशी चर्चा करुन लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मोबाईलद्वारे दररोज त्या महिलेच्या संपर्कात होता. या दरम्यान फेब्रुवारीमध्ये एक दिवस त्याने आपले आपल्या घटस्फोटीत बायकोशी भांडण झाले असून माझ्या दोन्ही मुलीला ती घेवून गेली असल्याचे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी मी एक मुलगी सोबत आणली असून तशी नोटरी केल्याचेही त्याने त्या महिलेला कळविले. माझ्या मुलीची परीक्षा असल्याने त्याने तिला घारगावला येण्याची गळ घातली. ही महिला सदर ठिकाणी आली व रत्नपारखीने स्वतःच्या मुलीसह आपल्या खोलीवर ठेवले. ड्यूटीवर गेलेला रत्नपारखी मध्यरात्री परत आला आणि महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्या महिलेने लग्न कधी करणार याबाबत विचारणा केली असता 19 फेब्रुवारी रोजी त्याने मंगळसूत्र व जोडवे आणून तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. त्यानंतर त्याने वेळोवेळी लग्नाचे अमिष दाखवित तिच्यावर अत्याचार करत राहिला. त्यातून तिला गर्भधारणा झाली. त्यामुळे नंतर जबरदस्तीने तिला आळे येथील डॉ.व्ही.जी.मेहेर यांच्या निरामय हॉस्पिटलमध्ये जाऊन गर्भपात केला गेला. त्यामुळे आपण फसल्याची जाणीव झाल्याने तिने अखेर घारगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार संशयित आरोपी पोलीस शिपाई सुनील यशवंत रत्नपारखीसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

classi 2.jpg
bottom of page