top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

तुम्हालाही करता येणार "तुरूंग पर्यटन"

एखाद्याने काही गुन्हा केला की त्याला तुरूंगात टाकले जाते, सिनेमा आणि मालिकांमधून तुरूंगातील जीवन आपण पाहत असतोच. पण, प्रत्यक्षात तुरूंग सर्वसामान्यांना बघता येत नव्हता. आता राज्य सरकारने याचं दिशेनं पाऊल टाकत 'तुरूंग पर्यटन' योजना सुरू करणार आहे. याची सुरूवात २६ जानेवारी २०२१ पासून होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'तुरूंग पर्यटन' या योजनेचं उद्घाटन करण्यात येणार आहे. येरवडा जेलपासून याची सुरूवात झाल्यानंतर टप्प्यानं राज्यातील इतर जेलचा यात समावेश केला जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात ६० तुरूंग असून जवळपास २४ हजार कैदी या तुरूंगात आहेत. ३ हजार कैदी तात्पुरत्या तुरूंगात आहेत. तुरूंग पर्यटनाला विद्यार्थी व नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. २६ जानेवारीपासून याची सुरूवात केली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतून व्हिडीओ कॉन्फरन्सिद्वारे यांचं उद्घाटन करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्यक्ष पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आपण स्वतः गोंदियातून या कार्यक्रमाला हजर राहणार आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली.

भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात महाराष्ट्रातील येरवडासह ठाणे, नाशिक, धुळे व रत्नागिरी या कारागृहांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बहुमूल्य योगदान देणारे महात्मा गांधी,लोकमान्य टिळक,मोतीलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू,सरदार वल्लभभाई पटेल,सरोजिनी नायडू यांच्यासह अनेक थोर नेत्यांना येरवडा कारागृहात बंदिवासात ठेवलं होतं. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामधील प्रसिद्ध पुणे करार येरवडा कारागृहातच पार पडला होता. ही ऐतिहासिक ठिकाणे पर्यटकांना पाहता यावीत यासाठी 'तुरूंग पर्यटन' ही योजना सुरू करत असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितलें.

classi 2.jpg
bottom of page